Friday, February 18, 2011

राजे ! खरच तुम्ही पुन्हा एकदा जन्म घ्याच !!!




आजच्या या शिवजयंती निमित्य राजे तुम्हाला या तुमच्या मावळ्याची मनापासून घातलेली साद !

साडे तीनशे वर्ष अन्याय-अत्याचाराने होरपळत असणाऱ्या आमच्या जनतेने आणि स्वाभिमान तथा स्वातंत्र्याची साक्षात भवानी असलेल्या जिजाऊ ने जेंव्हा तुम्हाला मनापासून साद घातली तेव्हा राजे तुम्ही या मराठी मायभूमी मध्ये जन्म घेतला, आपल्या या मातृभूमी साठी आपले रक्त सांडून तुम्ही आमच्या साठी स्वराज्य निर्माण केले, प्रसंगी मृत्यूलाही घटकाभर ताटकळत ठेवलं का तर तुम्हाला जिजाऊ साहेबांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणायचे होते! पण सध्या तुम्हीच निर्माण केलेल्या या स्वराज्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आज तुमचे मावळे परत आपला स्वाभिमान हरवून बसले आहेत, मनगटात बळ तर आज हि आहे पण ते अन्यायाविरुद्ध पेटतांना दिसतच नाहीत.. जे अजूनही लढत आहेत त्यांच्या पाठीशी कोणी हि नाही, गनिमांनी रचलेल्या जाळ्यात एक एक लढणारा अडकून आपले प्राण सोडत आहे, काळ फार बाका उभा राहिला आहे राजे ... अशावेळी तुमची आठवण नाही करून कसे चालणार.

राजे ज्या स्वराज्यात तुम्ही ज्या आया-बहिणींच्या अब्रू वाचवल्या.. त्यांचे पावित्र्य अभंग आणि साबूत ठेवले त्यांच्याच काही औलादी आज तुमचे "बाप" कोण यावर "चर्चा" करतांना दिसत आहेत, ज्यांच्यावर तुम्ही एखाद्या पित्या प्रमाणे प्रेम केले, अन्यायापासून वाचवण्यासाठी त्यांच्यावर तुमचे - आणि तुमच्या मावळ्यांचे कवच ओढले ! त्यांचेच काही वारसदार आज तुमच्या कर्तुत्वावर दुसऱ्या कोणाचे पांघरून घालण्याचा प्रयत्न करत आहेत.. पण सूर्याला झाकता तरी कसे येणार.. ! हे सर्व पाहून राजे अंगात रक्त सळसळून उठते पण ते तेवढ्याच वेगाने थंड हि होते ... राजे काळ फार कठीण आहे, म्हणून म्हणतो राजे तुम्ही एकदा जन्म घ्याच !

जे स्वराज्य उभे करतांना तुम्ही आपल्या जीवाचे रान केले, एक एक मावळा हे स्वराज्य उभा करण्यात खर्ची गेला.. ज्यांच्या घामातून आणि रक्तातून हा महाराष्ट्र उभा राहिला तोच महाराष्ट्र आज भ्रष्टाचारी लुटारुंच्या ताब्यात गेला आहे, सगळी कडून या मातृभिमिचे लचके तोडण्याचे काम चालू आहे, एका असहाय्य स्त्री वर अतिप्रसंग करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाला सजा करणारे तुम्ही आज आपल्याच मातेचा लिलाव मांडणार्यांना कोणती सजा करणार?? .. तुमच्याच नावाने हे लोक राज्य करतात, तुमचेच नाव घेऊन मतांची झोळी घेऊन फिरतात.. यांच्या पापांची झोळी भरून वाहते आहे राजे .. यांचे हात-पाय कलम करायला खरच तुम्ही एकदा जन्म घ्याच !

"माझ्या स्वराज्यात शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये" अशी सिंह गर्जना करणारे राजे तुम्ही आणि आज तुमच्याच या स्वराज्यात त्याच शेतकऱ्याच्या गळ्यात फाशीचा फंदा आला आहे... रोज रोजच्या मरणाला कंटाळून तो तरी काय करणार .. रोजचे हे मरण जगण्यापेक्षा त्याने आपली हि लढाई संपवण्यातच धन्यता मानलेली आहे ! तरी देखील त्यांच्या मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारे काही कमी नाहीत .. मेल्यावरही ज्यांची आज सुटका होत नाही त्या शेतकर्यासाठी त्याच्या घरच्यांसाठी राजे खरच तुम्ही एकदा जन्म घ्याच !

ज्या स्वराज्यातील गवताच्या काडीवर सुद्धा तुम्ही स्वतःचा हक्क कधी सांगितला नाही राजे त्याच स्वराज्यात आज शिक्षण क्षेत्र म्हणजे ठराविक लोकांची मक्तेदारी बनले आहे, गरीबाच्या पोरानं शिकूच नये जणू असा कायदाच बनला आहे, प्रत्येक क्षेत्रावर वटवाघाळासारखे चिटकून बसलेले काही लोक आणि त्यांच्याच पिढ्या ह्यांनी आज हि आम्हाला आमच्या मुलभूत गरजांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले आहे. स्वराज्य कोणाचे ? हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे .. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी .. कोणासाठी स्वराज्य निर्मिले हे सांगण्यासाठी राजे खरच तुम्ही एकदा जन्म घ्याच !

जेव्हा जेंव्हा स्वराज्यावर संकट आले, लाखोंचे सैन्य घेऊन कित्येक दुश्मन चालून आले तेंव्हा तेंव्हा राजे तुम्ही आणि तुमच्या मावळ्यांनी त्यांना त्यांच्या छावणीत घुसून यमसदनी धाडले पण आज तुमच्याच या स्वराज्यात दुश्मन उघडपणे आमच्याच घरात घुसून आमच्या छाताडावर मृत्यूचा तांडव करतो आहे, आम्ही षंढ पणे बघण्यापलीकडे काही हि करू शकत नाहीयेत ! ज्यांच्या हाती आमचे संरक्षण दिले तेच राजकारणी आमच्याच मारेकर्यांना पोसण्याचे काम आज करीत आहेत... उघड उघड आमचेच लोक रोज आमचा मुडदा पडत आहेत .. आमच्यातल्या या मेलेल्या पुरुषार्थाला एकदा कायमचा अग्नी देण्यासाठी राजे खरच तुम्ही एकदा जन्म घ्याच !

राजे तुमच्या स्वराज्याचा जाहीरनामा होता - वचननामा होता " सर्वास पोटास लावणे आहे" पण आज तुमच्या याच स्वराज्यात गरीब शेतकरी आणि कामगाराला देशोधडीला लावण्याचे काम चालू आहे, पाणी, रस्ते, वीज आणि रोजगाराचे तेच ते गाजर दाखवून तेच तेच लोक परत सत्तेत मिरवतांना दिसत आहेत, एकीकडे दोन वेळ पोटाला अन्न नसलेल्यांची संख्या आता कोटींवर गेली आहे आणि आणि दुसरीकडे कोट्यावधी रुपयांचा खच परदेशी बँकांमध्ये जमा होतोय हा कसला विरोधाभास राजे... ज्या स्वराज्यात एखादा उपाशी झोपला तर तुम्हाला झोप लागत नव्हती त्याच स्वराज्यात आज करोडो लोकांना उपाशी ठेवून आम्ही कुठल्या गाढ झोपे मध्ये आहोत.. आम्हाला या गाढ झोपेतून उठवण्यासाठी - महासत्तेच्या स्वप्नात अडकलेल्यांचे डोळे उघडण्यासाठी राजे खरच तुम्ही एकदा जन्म घ्याच!

तरी हि राजे ..
आज आम्ही आणि आमच्यासारखे असंख्य मावळे आज हि हे जाती-पातीचे मुडदे गाडायला तयार आहेत, फ़क़्त तुमचा आदेश हवा !
आजही शिक्षणाची आणि विकासाची गंगा घरा-घरापर्यंत पोचवण्यासाठी झगडणारे हजारो भगीरथ आहेत .. त्यांना फ़क़्त तुमची साथ हवीये !
भ्रष्ट आणि पिढीजात राजकारण्यांना दूर हटवून नव्या दमाच्या तरुणांच्या हाती हा देश देण्यासाठी, फ़क़्त तुमचा आदर्श हवा !
साडे तीनशे हून अधिक वर्षे झाली आज हि तुम्ही आमच्या मनावर अधिराज्य गाजवता .. आज हि तुमचे नुसते नाव घेतले तरी आमच्या अंगा-अंगातून एक चैतन्य सळसळते.. तुमच्या या मुठभर मावळ्यानसाठी तुम्ही पुन्हा एकदा जन्म घ्याच!

आणि राजे जरी आज तुम्ही आले तरी आम्हाला माहित आहे तुम्ही आमच्या हाती तलवार देणार नाहीत, काळाचे पाऊले ओळखणारे तुम्ही .. तुम्हाला माहित आहे आजचे युद्ध आहे ज्ञानाचे, संगणक - माहिती तंत्रज्ञानाचे, विचारांचे .. आता गरज आहे तुमच्या तेजस्वी अशा शिव-चरित्रातून काही प्रेरणा घेण्याची !! आजच्या या स्पर्धात्मक युगात कला, क्रीडा, विज्ञान , संस्कृती, भाषा,प्रशासन अशा अनेक क्षेत्रा मधले विविध गड जिंकून तुम्ही निर्माण केलेल्या स्वराज्याला खऱ्याखुऱ्या सुराज्याच स्वरूप देण्याची.

हे सर्व पाहण्यासाठी .. आम्हाला बळ देण्यासाठी राजे खरच तुम्ही एकदा जन्म घ्याच !

महाराष्ट्र कुलस्वामी आई तुळजाभवानी आजच्या या पावन दिनी पुन्हा तुला एक साकड घालतो ..
"अंधार होत चाललाय दिवा पाहिजे .. अंधार होत चाललाय दिवा पाहिजे ..
या मातीला परत एकदा जिजाऊ चा शिवा पाहिजे !! शिवबा पाहिजे !!!"

जय भवानी .. जय जिजाऊ .. जय शिवराय ..

तमाम शिवभक्तांना युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्य हार्दिक शुभेच्छा !!!!

कार्यकर्ते जिजाऊ.कॉम

3 comments:

Anonymous said...

Yes

udayraj said...

Very good.

सत्यशोधक मराठा said...

http://satyashodhak.com/2011/02/19/%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%97%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%95-%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%9c%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%aa/

Post a Comment