Thursday, April 29, 2010

५० वर्षे गर्जे महाराष्ट्र माझा

असे म्हणतात जगाला भूगोल आहे पण या माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे, असा एक वेगळा इतिहास ज्याचे केवळ स्मरण जरी केले तरी आमच्या छाताडा मध्ये एक स्फुरण चढते, मान अभिमानाने उंचावली जाते, एक गर्वाची भावना मनामध्ये येते. पण हा गौरवशाली इतिहास घडवणारी माणसे काही सामान्य नव्हती, आपले रक्त सांडून , वेळप्रसंगी आपल्या जीवाचे बलिदान देऊन त्यांनी हा अखंड, कणखर महाराष्ट्र घडवला. आज नकाशावर दिसणारा महाराष्ट्र म्हणजे आमच्या १०५ हुतात्म्यांच्या रक्तातून मिळालेला हा सयुंक्त महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेला ५० वर्ष पूर्ण होत आहेत, महाराष्ट्र आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणार आहे. ५० वर्ष, ज्या सोनेरी महाराष्ट्राची स्वप्न आम्ही पहिले होते, जो मंगल कलश घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये दाखल झाले होते, तो महाराष्ट्र आज गेल्या ५० वर्षामध्ये कुठे आहे आणि कसा आहे ह्याची एकदा उजळणी झाली पाहिजे, ह्या विचारांचा उहापोह आपल्या प्रत्येक मराठी मनाच्या लोकांमध्ये झालाच पाहिजे.

ज्यांनी आम्हाला एक स्वप्न दिले, ज्यांनी आम्हाला हा संपन्न महाराष्ट्र सोपवला त्या महाराष्ट्राचं आम्ही पुढील ५० वर्षामध्ये काय करणार हे हि आपल्याला ठरवावे लागणार.

१ मे १९६०, मुंबई सह महाराष्ट्राची निर्मिती झाली, स्वतंत्र भारतात स्वकियांशीच लढा देऊन सयुंक्त महाराष्ट्र मिळवावा लागला, जगातील ज्या महान स्वातंत्र्य लढ्याची जन्मभूमी हि महाराष्ट्र होती त्याच भूमीच्या अस्तित्वासाठी पुन्हा एक स्वातंत्र्य लढा द्यावा लागला. गोळीबार झाला, लाठीचार्ज झाला, कित्येक लोकांना तुरुंगात टाकण्यात आले, पण मराठी मातीत जन्मलेला, प्रचंड स्वाभिमानी वर्ग ह्या लढ्यामध्ये आपले सर्वस्व झोकून देत होता, सबंध महाराष्ट्र पेटून उठला आणि दिल्लीश्वरांना आपले गुडघे टेकवावे लागले, मुंबई, महाराष्ट्राविषयी आकस असणारे, लाचार आणि स्वाभिमान शून्य लोकांच्या पार्श्वभागावर लाथ घालून तमाम मराठी जनतेने एक आनंदाचा सोहळा अनुभवला.

मुंबई, विदर्भ आणि मराठवाड्यासह महाराष्ट्राची निर्मिती झाली, आणि या महाराष्ट्राने दाखवून दिले कि हाच सयुंक्त महाराष्ट्र या देशाच्या विकास कार्यामध्ये किती महत्वाचा सहभाग नोंदवू शकतो, असे कुठलेही क्षेत्र नाही जिथे आज मराठी माणसाने आपला ठसा उमटवला नाही, महाराष्ट्राविषयी आणि मराठी माणसाविषयी आकस ठेवणारी माणसे नेहमी मराठी माणसाविषयी नकारात्मक बोलतात, पण आज महाराष्ट्रचे जे स्थान केवळ भारताच्या नव्हे तर जगाच्या पाठीवर आहे ते कोणामुळे आहे, इथे वर्षानुवर्षे राहणाऱ्या मराठी मनाच्या लोकांमुळेच ना, का स्वातंत्र्यानंतर या महाराष्ट्राचं विकास करायला कुठली इस्ट इंडिया कंपनी आली होती , नाही या महाराष्ट्राच्या विकासामागे दुसरा - तिसरा कोणी नसून इथे राहणारा मराठी माणूस आहे. मग ते अंबानी असतील, किंवा टाटा असतील, हे त्यांच्या तन- मानाने केवळ आणि केवळ मराठीच आहेत (दोन दिवसांपूर्वीच मुकेश अंबानीचे हे वक्तव्य - " मी जन्माने आणि कर्माने महाराष्ट्रीयन आहे ) अशा सर्व मराठी माणसांचा आम्हाला अभिमान आहे. आज सर्वच क्षेत्र मग ते कला, क्रीडा, चित्रपट, राजकीय, सामाजिक, आर्थिक , साहित्य ह्या सर्व क्षेत्रांमध्ये मराठी माणसाचे जे स्थान आहे ते खरोखरच आढळ आणि अटल आहे, त्या सर्वांचा आम्हाला खूप अभिमान आहे.

५० वर्षातील हि वाटचाल खूप सकारात्मक आहे, पण हा आनंद असतांनाच आपल्याला पुढील ५० वर्षामध्ये काही ध्येय धोरण करूनच पुढील वाटचाल करावी लागेल.
आज उर्जा, शिक्षण, रोजगार, शेती या क्षेत्रात महाराष्ट्राला मुलभूत बदल करणे आवश्यक आहे, आजवर महाराष्ट्राने भारतासमोर एक आदर्श निर्माण केला आहे तोच आदर्श आपल्याला पुढील काही वर्षामध्ये ह्या क्षेत्रांमध्ये देखील केवळ भारतासमोर नव्हे तर सबंध जगासमोर उभा करावा लागेल.

महाराष्ट्रातील प्रत्येक मुला-मुलीला गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, शिक्षण घेतलेल्या प्रत्येक हाताला रोजगार देणे, ज्या काळ्या मातीचा अभिमान आम्ही बाळगतो ती माती जो शेतकरी आपल्या घामाने कसतो, त्या शेतकर्याची स्थिती हि बदलण्याची वेळ आता आली आहे. ह्या सर्व क्षेत्रांमध्ये आजवर तात्कालिक स्वरूपाचे औषध-उपचार झालेले आहेत, पण या क्षेत्राला लागलेल्या रोगांवर आता कायमस्वरूपी इलाज करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ज्या सोनेरी महाराष्ट्राची स्वप्ने आपण बघत असतो, तो घडवायचा असेल तर आपल्यालाच आता या गोष्टींवर लक्ष देऊन त्या संदर्भात पाऊल उचलण्याची गरज आहे, या क्षेत्रांसाठी एक क्रांतिकारक धोरण आखले जाण्याची आज गरज आहे, महाराष्ट्रामध्ये बौद्धिक दिवाळखोरी कधी नव्हती ना सध्या आहे, गरज आहे आपला डोकं आता या प्रगत महाराष्ट्राच्या मुलभूत विकासाकडे लावण्याची. विविध क्षेत्रातील लोकांनी एकत्र येऊन या महाराष्ट्राला घडवण्यासाठी आपले विचार आपले आचार समाजासमोर आणण्याची गरज आहे.
जर प्रकाश आमटे सारखे लोक दुर्गम जंगलात राहून, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये देखील देखील तिथे "हेमलकसा" सारखे प्रकल्प याश्वासी करू शकतात, तर आपल्याला सर्व गोष्टी अनुकूल असतांना आम्ही का गप्प राहायचं. काही तरी करण्याची जिद्द सर्वांकडेच असते. गरज असते फ़क़्त सुरुवात होण्याची तर ती वेळ आज आली आहे. महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन एक संकल्प करावा कि आप आपल्या परीने मी हा महाराष्ट्र घडवण्यासाठी स्वतः पलीकडे जाऊन देखील काही तरी करील , संपूर्ण आयुष्य आम्ही स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी जगतो मग या आयुष्यातून काही वेळ आपल्या येणाऱ्या पिढीसाठी काढूया, त्यांच्या समोर एका सकल, संपन्न आणि प्रगत महाराष्ट्र उभा करूया. मागील पिढीने जमीन कसून ठेवली आहे, आता त्यावर काही चांगल पेरणी करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, तेव्हाच येणाऱ्या पिढीला या सर्वांची फळे खायला भेटतील अन्यथा भविष्यात केवळ आणि केवळ अंधकार आहे.

महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी पदार्पणा निमित्य तमाम मराठी मनाच्या लोकांना खूप खूप शुभेच्छा ...

चला एक महाराष्ट्र घडवूया ..... स्वप्न तुमचे - स्वप्न आमुचे - स्वप्न नव्या महाराष्ट्राचे ...

जय हिंद .. जय महाराष्ट्र
- अमोल

No comments:

Post a Comment