Monday, November 23, 2009

"शिवप्रताप दिनाच्या" हार्दिक शुभेच्छा


२४ नोव्हेंबर "शिवप्रताप दिन ", याच दिवशी या स्वराज्यावर आलेल्या संकटाला यमसदनी धाडण्याचे काम प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी केले होते.

आदिलशाही दरबारात शिवरायांचा कायमचा बिमोड करण्याचा विडा उचलून एक अफाट ताकदीचा सरदार अफजल खान स्वराज्यावर चालून आला. तमाम मराठी मुलुख त्याच्या अत्याचाराखाली होरपळून निघाला होता. त्या वेळी लढाई होती अन्यायाच्या विरोधात, ती नव्हती कुठल्याही धर्माच्या विरोधात.

स्वराज्यावर, आपल्या मायभूमीवर चालून आलेल्या या संकटास कसे सामोरे जावे याचे जिवंत आणि जातिवंत उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांनी केलेला अफजल खानाचा केलेला वध.

आज जेव्हा आपली भारत भूमी सर्वत्र संकटांनी ग्रासली असतांना, सर्वत्र अतिरेक्यांनी आणि नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घातलेला असताना आम्हाला आपला स्वार्थ विसरून आपलाच इतिहास पुन्हा एकदा आठवावा लागेल.

दोन दिवसांनी आम्ही पुन्हा एकदा गेल्या वर्षीच्या अतिरेकी हल्ल्याच्या आठवणी मध्ये रंगून जाणार, पण त्या आधी आपण त्या आमच्या आराध्य छत्रपतींना क्षणभर स्मरण करूया. आठवण करूया त्यांनी केलेल्या त्या पराक्रमाची, युक्ती आणि शक्तीने आलेले संकट दूर केल्याची. या भूमी वर चालून आलेल्या दुश्मनाचा कोथळा बाहेर काढल्या शिवाय पर्याय नाही कारण आपण हे केले नाही तर आपला केवळ विश्वास घातच होत राहणार.

आतंकवादाला आणि राष्ट्रादोहाला फ़क़्त एकाच प्रकारे उत्तर दिले जाऊ शकते.

आज त्याच अफजल खानाच्या उदात्तीकरणाचे प्रयत्न काही धर्मांध शक्तींद्वारे होत आहे, त्या जुलमी खानाचा धर्म आज काही लोकांना सांगितला जात आहे. या सर्व प्रकारावर राजकीय पोळी भाजण्याचे काम चालू आहे. पण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी हा राक्षसी प्रवृत्तीचा अफजल खान म्हणजे कोण्या एका धर्माचा नव्हता, न हि तो इस्लाम चा कोणी सुफी संत होता .. तो होता एक अन्याय करणारा .. आपल्या मायभूमीवर अत्याचार करणारा, आणि त्याचा सर्वनाश हा आतलाच होता. हि ऐतिहासिक घटना कुठल्याही एका धर्मासाठी अभिमानाची न राहता ती आपण सर्वांसाठी आणि आपल्या सारख्या राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी खरोखरच अभिमानाची गोष्ट असली पाहिजे.

याच खानाला आजच्या दिवशी सुमारे ३५० वर्षापूर्वी यमसदनी पाठवण्यात आले होते, स्मरण करूया त्या पराक्रमाची .. त्या प्रखर राष्ट्रनिष्ठेची.

आमचा इतिहास हाच आमचा आत्मा आहे त्याचे विस्मरण होता कामा नये. २६-११ च्या निमित्याने या पराक्रमची नुसती आठवण करून चालणार नाही तर या मातीवर चालून येणार्यांना इथेच गाडले पाहिजे हे हि आपण शिकले पाहिजे. आणि मला आत्मविश्वास आहे शिवचरित्र मधून आम्ही नक्कीच या गोष्टी शिकू, येणाऱ्या प्रत्येक संकटाला ध्येर्याने आणि सर्वशक्तीने सामोरे जाऊ.

आपण सर्वांना "शिवप्रताप दिनाच्या" हार्दिक शुभेच्छा.

जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ

अमोल सुरोशे आणि प्रकाश पिंपळे

No comments:

Post a Comment